Tuesday, April 5, 2011

भारतीय संघाचे अभिनंदन

विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन !

Thursday, March 31, 2011

भारतीय संघाचे अभिनंदन ! हिम्मत है मर्दा, तो मदद दे खुदा !

  पाकिस्तानी संघाला धूळ चारीत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन !
   धोनीमहाशयांचे नशीब जोरावर आहे यात शंकाच नाही. हिम्मत है मर्दा, तो मदद दे खुदा ! अत्यंत दबावाखाली भारतीय संघाने आपला खेळ उंचावला. सेहवागने मारलेले चौकार प्रेक्षणीय.  सचिन आणि रैनाच्या फलंदाजीमुळे २६० चा स्कोर उभारता आला. रैना चिवट आहे. आस्ट्रेलिया विरुद्ध आणि आता पाकविरुद्ध शेवटपर्यंत तो टिकला. युवराज आणि हरभजन यांनी वेळेवर विकेट घेतल्या. नेहराने चांगली बोलिंग केली. आपली बोलिंग अचूक होती. पाकच्या मानाने आपण वाईड, नोबॉल कमी दिले. इथेच फरक स्पष्ट झाला. 
  आपले क्षेत्ररक्षण उत्तम झाले. आपला अंतिम सामना श्रीलंकेशी आहे. दिलशान, संगक्कारा यांना लवकर आउट केले, मलिंगा, मुरली यांना शरण गेलो नाही तर विश्वचषक आपलाच. 
  पुन्हा भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा !

Wednesday, February 2, 2011

पेढ्यांचे वेडे

       लहानपणापासून आम्ही तसे पेढ्यांचे वेडेच ! मूळ गाव चांदवड असल्याने तसे असेल कदाचित. आमच्या चांदवडचे पेढे अतिशय प्रसिध्द ! चांदवड तालुक्यात शुद्ध, खात्रीशीर खवा मिळतो. विशेषत: वडनेर भैरव, धोडांबे (धोडप किल्ल्यासाठी प्रसिध्द गाव), हट्टी येथील खवा अतिशय प्रसिध्द. अस्सल खव्याचा जाणकार तर हट्टीचा (गावाचे नाव) खवा आवर्जून नेतो. चांदवडचे पेढे खमंगपणासाठी प्रसिद्ध. ताज्या, कच्च्या मलईचा पेढा तर कोणीही बनवेल. मलईपेक्षाही खव्याचा पेढा बनविण्यात चांदवडकर पटाईत. खवा आणून लाल होईपर्यंत खमंग भाजायचा. त्यात प्रमाणशीर साखर टाकायची. नंतर पेढे वळायचे. असे हे पेढे नुसतेच गोड नाही तर मधुर लागतात. पूर्वीच्या काळी तर साखरेऐवजी गूळ वापरायचे. त्या खमंगपणाला तर जगात तोड नव्हती. हा पेढा भाजलेला असल्यामुळे मलई पेढ्यापेक्षा खूप जास्त टिकतो.   चांदवडचे बाजारवेशीतले  लिन्गायाताकडचे, हायवेवरचे भैरवनाथाकडचे पेढे अतिशय प्रसिद्ध. तर मंडळी, कधी चांदवडमार्गे  गेलात तर अवश्य पेढे घ्या. 
        आमच्या चांदवडसारखीच थोडीशी चव मिळाली ती परतवाड्याच्या पेढ्यांची. जवळ जवळ शंभर ते दीडशे ग्रामचा एकच पेढा असावा. एक पेढा खाल्ला तरी पोट भरते. उपवासाला दुसरा फराळ करायची गरज नाही. हा ही भाजलेला असतो. 
       नाशिकचे मलई पेढे प्रसिध्द. पण वरच्या दोन्ही पेढ्यांची सर नाही. 
       साताऱ्याचे कंदी पेढे तर थेट पुण्याशीच नाते सांगतात. पेढा खाल्ला आहे की नाही अशी शंका यावी इतका छोटा आकार. 
       मंडळी तुमचा पेढ्याचा काय अनुभव ?

Monday, January 17, 2011

महाराष्ट्रात स्वर्ग ?

महाराष्ट्रात स्वर्ग ? 
होय महाराजा. कोंकण हा महाराष्ट्रातील स्वर्गच नव्हे का? 
महाराष्ट्रात सर्वात जास्त वनस्पतींची विपुल उपलब्धी कोंकणात आहे. सर्वात जास्त बायो डायव्हर्सिटी, जैव विविधता कोंकणात आहे. विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. कोंकण निसर्गसमृद्धतेने नटलेला आहे.
कोकणाने महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला नररत्ने दिली आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. 
आता तर कोकणात जमिनीत सोने सापडले आहे. समुद्रात तर मोती आहेतच. 
आहे की नाही कोकण हा महाराष्ट्रातील स्वर्ग ?

Wednesday, January 5, 2011

हंगामी भक्ती

        आपले देव जसे हंगामी, उत्सव हंगामी, तशी आपली भक्तीही हंगामी असते. गणपतीचे दिवस आले की आपण गणरायाच्या भक्तीत बुडून जातो. नवरात्र आले की देवीपुढे रांगा लागतात. चंपाषष्ठीला आपल्याला खंडोबाची आठवण येते. रामनवमीला रामाची तर जन्माष्टमीला कृष्णाची आरती करण्यात मग्न असतो. अशी हंगामी भक्ती केल्याने ते ते देव प्रसन्न होतील अशी आपली समजूत (गैर) असते. त्या त्या देवांच्या उत्सवात त्या मंदीरांमध्ये एवढी गर्दी लोटलेली असते की ढकला-ढकलीत देवांचे दर्शनही होणे मुश्कील.
       ज्यांना खरोखरीच देवाचे मनापासून दर्शन घ्यावयाचे आहे, त्याचे रूप भक्तीने न्याहाळायचे आहे त्यांनी शांततेत, गर्दी नसताना दर्शन घ्यावे. रामनवमीला कृष्णाचे अगदी शांततेत दर्शन होते. जन्माष्टमीला गणरायाच्या मंदीरात कितीही वेळ बसले तरी कोणी हटकणार नाही. गणेशोत्सवात देवीच्या मंदीरात भरपूर आराधना करता येईल.
      शांत, निवांतपणे आणि आनंदाने अशी ही ऑफ सिझन दर्शनाची सूट मिळते. आपल्याला अशी सूट पाहिजे का ?
            

Thursday, December 16, 2010

तिन्ही सांजा

सूर्यास्ताच्या वेळी,
दिवसाच्या या तिन्ही सांजांबरोबर,
माझ्याही आयुष्याच्या,
तिन्ही सांजा,
 सूर्योदयापासून विचार करतो, 
आयुष्यभर काय केले,
बालपणी खेळलो, बागडलो,
समजही नव्हती,
तारुण्यात,
तारुण्यात, स्वत:च्याच मस्तीत,
कुणाला न जुमानता,
आणि आता वार्धक्यात,
तारुण्यातील व्यसनांनी जर्जर झालेले शरीर,
जीवनात काय मिळवले,
मुला-नातवंडांकडून तिरस्कार,
शिथील गात्रे,
आता रात्र होण्याची वाट पाहत आहे,
बुडवून टाकावे काळरात्रीच्या  अंधारात !
जेथे स्वत:चाही चेहरा स्वत:पासून लपविता येतो,
त्या मृत्यूचे स्वरूप पहायचे आहे,
आनंदाने ! दु:खानेही !!

                                                                                                                                                 -गोपालMonday, December 6, 2010

प्यार की झप्पी

मंडळी,
संजय दत्तची प्यार की झप्पी सगळयांनाच ठाऊक असेल. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगाराला दिलेली प्यार की झप्पी सगळ्यांनाच आठवते.
रोजचे काम करणारे व्यक्ती नक्कीच अशा कृतीने मोहरून जातात. अगदी रोजच्या भांडेवालीला एखाद्या दिवशी आज भांडे स्वच्छ घासलेस असे म्हणा बरे.
ईस्त्रीवाल्या धोब्याला किती कडक ईस्त्री केलीस म्हणून सांगा. तुमच्या कपड्यांची खरच कडक ईस्त्री तो करून देईल. ऑफिसात सफाई करणारया शिपायाला टेबल किती स्वच्छ पुसलास म्हणून
त्याच्या कामाची पावती द्या बरे. तो नक्कीच तुम्हाला त्या दिवशी परत दिसला की  नमस्कार घालेल. रोज तुमचे टेबल इतरांपेक्षा स्वच्छ पुसेल.
तुमच्या हाताखालच्या माणसांचे असे छोटे छोटे कौतुक केले तर तुम्ही नक्कीच लोकप्रिय Boss
व्हाल. तुमच्या प्रोजेक्टचे टार्गेट तुम्ही गाठू शकाल. तुमच्या अडचणींच्या वेळी तुम्हाला मदत मिळेल.
हॉटेलात जेवल्यानंतर एखादा पदार्थ आवडल्याची पावती मालकाला दिली तर ती बिलापेक्षाही मोठी असेल.
अहो, स्तुती कोणाला प्रिय नाही. प्रत्यक्ष देवसुद्धा स्तुतीनेच प्रसन्न होतो. साधू, संत, ऋषी, मुनी हे सुद्धा स्तुतीप्रियच आहेत. तुम्ही आम्ही तर सामान्य माणसेच. Appreciation हे रोजच्या व्यवस्थापनात दाखवले, तर यशाची पायरी गाठता येईल.
तर मंडळी, तुम्हाला काय वाटते ?
तुम्ही असे कधी केले आहे का ?