Wednesday, February 2, 2011

पेढ्यांचे वेडे

       लहानपणापासून आम्ही तसे पेढ्यांचे वेडेच ! मूळ गाव चांदवड असल्याने तसे असेल कदाचित. आमच्या चांदवडचे पेढे अतिशय प्रसिध्द ! चांदवड तालुक्यात शुद्ध, खात्रीशीर खवा मिळतो. विशेषत: वडनेर भैरव, धोडांबे (धोडप किल्ल्यासाठी प्रसिध्द गाव), हट्टी येथील खवा अतिशय प्रसिध्द. अस्सल खव्याचा जाणकार तर हट्टीचा (गावाचे नाव) खवा आवर्जून नेतो. चांदवडचे पेढे खमंगपणासाठी प्रसिद्ध. ताज्या, कच्च्या मलईचा पेढा तर कोणीही बनवेल. मलईपेक्षाही खव्याचा पेढा बनविण्यात चांदवडकर पटाईत. खवा आणून लाल होईपर्यंत खमंग भाजायचा. त्यात प्रमाणशीर साखर टाकायची. नंतर पेढे वळायचे. असे हे पेढे नुसतेच गोड नाही तर मधुर लागतात. पूर्वीच्या काळी तर साखरेऐवजी गूळ वापरायचे. त्या खमंगपणाला तर जगात तोड नव्हती. हा पेढा भाजलेला असल्यामुळे मलई पेढ्यापेक्षा खूप जास्त टिकतो.   चांदवडचे बाजारवेशीतले  लिन्गायाताकडचे, हायवेवरचे भैरवनाथाकडचे पेढे अतिशय प्रसिद्ध. तर मंडळी, कधी चांदवडमार्गे  गेलात तर अवश्य पेढे घ्या. 
        आमच्या चांदवडसारखीच थोडीशी चव मिळाली ती परतवाड्याच्या पेढ्यांची. जवळ जवळ शंभर ते दीडशे ग्रामचा एकच पेढा असावा. एक पेढा खाल्ला तरी पोट भरते. उपवासाला दुसरा फराळ करायची गरज नाही. हा ही भाजलेला असतो. 
       नाशिकचे मलई पेढे प्रसिध्द. पण वरच्या दोन्ही पेढ्यांची सर नाही. 
       साताऱ्याचे कंदी पेढे तर थेट पुण्याशीच नाते सांगतात. पेढा खाल्ला आहे की नाही अशी शंका यावी इतका छोटा आकार. 
       मंडळी तुमचा पेढ्याचा काय अनुभव ?

1 comment:

  1. डॉक्टर साहेब नमस्कार.
    आमच्या पुण्याच्या पेढ्याला आकारमाना मुळे नावं ठेवलीत,हरकत नाही,कदाचित तुमचा तो अनुभव खरापण असु शकेल,तथापि,लक्ष्मीरोड वरच्या घोडक्यांचे पेढे हे आपण एकदा खाऊन बघावे अशी मी आपल्याला विनंती करतो.खरच छान असतात बरं का? आणि ते ही पुणं पेढ्यां साठी प्रसिद्ध नसतांना.असो.आपल्या चांदवडी पेढ्यांच्या माहिती बद्दल आभार.मला नवीन होती. धन्यवाद

    ReplyDelete