Showing posts with label पेढा. Show all posts
Showing posts with label पेढा. Show all posts

Wednesday, February 2, 2011

पेढ्यांचे वेडे

       लहानपणापासून आम्ही तसे पेढ्यांचे वेडेच ! मूळ गाव चांदवड असल्याने तसे असेल कदाचित. आमच्या चांदवडचे पेढे अतिशय प्रसिध्द ! चांदवड तालुक्यात शुद्ध, खात्रीशीर खवा मिळतो. विशेषत: वडनेर भैरव, धोडांबे (धोडप किल्ल्यासाठी प्रसिध्द गाव), हट्टी येथील खवा अतिशय प्रसिध्द. अस्सल खव्याचा जाणकार तर हट्टीचा (गावाचे नाव) खवा आवर्जून नेतो. चांदवडचे पेढे खमंगपणासाठी प्रसिद्ध. ताज्या, कच्च्या मलईचा पेढा तर कोणीही बनवेल. मलईपेक्षाही खव्याचा पेढा बनविण्यात चांदवडकर पटाईत. खवा आणून लाल होईपर्यंत खमंग भाजायचा. त्यात प्रमाणशीर साखर टाकायची. नंतर पेढे वळायचे. असे हे पेढे नुसतेच गोड नाही तर मधुर लागतात. पूर्वीच्या काळी तर साखरेऐवजी गूळ वापरायचे. त्या खमंगपणाला तर जगात तोड नव्हती. हा पेढा भाजलेला असल्यामुळे मलई पेढ्यापेक्षा खूप जास्त टिकतो.   चांदवडचे बाजारवेशीतले  लिन्गायाताकडचे, हायवेवरचे भैरवनाथाकडचे पेढे अतिशय प्रसिद्ध. तर मंडळी, कधी चांदवडमार्गे  गेलात तर अवश्य पेढे घ्या. 
        आमच्या चांदवडसारखीच थोडीशी चव मिळाली ती परतवाड्याच्या पेढ्यांची. जवळ जवळ शंभर ते दीडशे ग्रामचा एकच पेढा असावा. एक पेढा खाल्ला तरी पोट भरते. उपवासाला दुसरा फराळ करायची गरज नाही. हा ही भाजलेला असतो. 
       नाशिकचे मलई पेढे प्रसिध्द. पण वरच्या दोन्ही पेढ्यांची सर नाही. 
       साताऱ्याचे कंदी पेढे तर थेट पुण्याशीच नाते सांगतात. पेढा खाल्ला आहे की नाही अशी शंका यावी इतका छोटा आकार. 
       मंडळी तुमचा पेढ्याचा काय अनुभव ?